Monday, June 25, 2007

आजाचे गुपीत

एक होती तानुली
तिचं वय होत सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होत आजा
त्याचे वय होते सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचे अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थ्यान्क्यू आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थ्यान्क्यु तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होता ड्याडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती ड्याडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर ड्याडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघड्या डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हसायची
आणि ड्याडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.

No comments: