बटाट्याचा शिरा
साहित्य - बटाटे , साखर , वेलची पावडर , केशर , दुध , बदामाचे पाटळ काप , तूप
कृती - बटाटे उकडून त्यांची साले काढून टाकावी व जाड किसणावर किसून घ्या. थोड्या दुधात केशर भिजत घाला. पातेल्यात तूप गरम करुन त्यावर बटाट्याचा किस टाकून ते मिश्रण परतून घ्या. छान तांबूस रंग येऊन रवाळ होईपर्यंत भाजून घ्या. एक वाटी बटाट्याच्या रव्याला एक वाटी दूध घाला. वेलची पावडर , बदामाचे काप , केशरचे दूध घालून चांगली वाफ येऊ द्या.
साबुदाण्याचा लाडू
साहित्य - अर्धी वाटी साबुदाणा , दोन वाटी नारळ , साखऱ , साजूक तूप , वेलची पावडर
कृती - साबूदाणा दोन-अडीच तास भिजवून ठेवावा. खोब-याच्या प्रमाणात साखर मोजून त्यात घाला. नारळाचं पाणी घालून ढवळा. जाड बुडाच्या पातेल्यात एक टे. स्पून साजूक तूप गरम करावं. त्यात वरील मिश्रण घालून ढवळून घ्या. त्या मिश्रणात वेलची पावडर घाला. मिश्रणाचा गोळा होऊ लागला व ढवळण्यास जड वाटू लागले की पातेलं गॅसवरुन उतरवावं. त्यानंतर त्या मिश्रणाचे लाडू वळा.
दह्यातला थंडा साबुदाणा
साहित्य - एक वाटी साबुदाणा , दोन वा़टी ताक , दीड वा़टी गोड दही , दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे , तूप , जिरे , मीठ , साखर
कृती - साबुदाणा कढईत भाजून घ्या. त्यावर ताक ओतून दोन तास भिजत ठेवावा. वाढायच्या आधी तूप गरम करुन जीरे , मिरच्यांची फोडणी करा. साबुदाण्यामध्ये दही घालून त्यावर फोडणी द्या. चवीनुसार मीठ व साखर घाला. मिश्रणा व्यवस्थित एकजीव करुन घ्या. हा दह्यातला साबुदाणा चवीला छान लागतो.
शिंगाड्याचा ढोकळा
साहित्य- दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दाण्याचा कूट , मीठ , जिरे , आलं , चार टे. स्पून दही , दोन ओल्या मिरच्या , तूप , सोडा , ओलं खोबरं , हवी असल्यास कोथिंबीर
कृती - दोन वाटी पीठ , दही , पाणी घालून ढवळून सात-आठ तास भिजवून ठेवा. त्याआधी त्या मिश्रणात मिरच्या , आल्याचा तुकडा आणि जिरं वाटून घालावं. दोन टे. स्पून तूप घालून ढवळून घ्या. थोडासा सोडा घालून पुन्हा ढवळा. तूप लावलेल्या थाळ्यात पीठ ओतून कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात वाफवून घ्या. थंड झाल्यावर ओले खोबरं घाला.
सुरणाचे कबाब
साहित्य - सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप
कृती - सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस ताकात थोडा वेळ भिजत टाकावा व नंतर गाळून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार वरील सर्व साहित्य घाला. आलं मिरच्य़ांची पेस्ट करुन त्यात घाला. कबाब करता येतील इतपत राजगि-याचे पीठ घाला. त्यानंतर गोल किंवा लांबट आकाराचे कबाब तयार करुन ते तेलात लालसर तळावेत. छान कुरकुरीत कबाब चटणीबरोबर द्यावे.
व-याची भाकरी
साहित्य - व-याचे तांदूळ , कोमट पाणी , मीठ
कृती - तांदूळ मिक्सरमधून वाटून पीठ करुन घ्या. चवीपुरतं मीठ घालून कोमट पाण्याने भिजवा व नेहमीप्रमाणे व-याचे कोरडे पीठ वापरुन भाकरी करा.
गरमागरम भाकरी उपवासाच्या बटाट्याच्या , रताळ्याच्या भाजीबरोबर किंवा खोब-याच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर वाढा.
व-याचा सांजा
साहित्य- दोन वाट्या व-याचे तांदूळ , दोन वाट्या साखर , बेदाणा , काजू तुकडा , बदामाचे काप , तूप , वेलची पावडर
कृती- तांदूळ धुवून , निथळत ठेवा. पाव वाटी तूपावर तांदूळ परतून घ्या. नंतर त्यात चार वाटी पाणी उकळून घाला व किंचित मीठ घालून झाकण ठेवा. पाणी आटलं की साखर , वेलची पावडर , काजू , बदाम , बेदाणा घालून थोडंसं साजूक तूप घालून सांजा परता. एक वाफ आणा सांजा तयार.
शिंगाड्याचा केक
साहित्य - दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दही , एक वाटी तूप , दोन वाटी दूध , दीड वाटी साखर , एक वाटी ओलं खोबरं , एक टे. स्पून ओल्या नारळाचे पातळ काप , पाऊण टी स्पून सोडा
कृती - शिंगाड्याच्या पीठात साखर , तूप , दूध , दही घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्यामध्ये खोबरं , सोडा घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्य़ामध्ये खोबरं आणि चिमूटभर सोडा घालून फेटून घ्या. त्यानंतर ओवनमध्ये हे मिश्रण ठेवा. ओवन नसल्यास एका थाळीला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण ओता. ती थाळी गरम तव्यावर ठेवा. त्यानंतर त्यावर आणखी एक तवा घट्ट ठेवा आणि केक भाजून घ्या .
व-याची पानगी
साहित्य- दोन वाट्या व-याच्या तांदळाचे पीठ , एक वाटी साखर , दोन टी स्पून साजूक तूप , मीठ , दूध , खोवलेला नारळ अर्धी वाटी , दोन केळीची पानं
कृती - वरी तांदळाचं पीठ , साखर , तूप , मीठ आणि खोबरं , एकत्र करुन लागेल तेवढं दूध घालून भाकरीपेक्षा पातळ मळून घ्या. केळीच्या पानाच्या उभट लहान तुकड्यावर तूप लावून त्यावर लांबट आकारात पीठ थापून घ्या. त्यावर पुन्हा केळीच्या पानाचं आवरण द्या. तव्यावर पुन्हा एकदा केळीच्या पानाचं आवरण देऊन भाजून घ्या. वरुन झाकण ठेवा. वाफ आली की , पानगी उलटवून पुन्हा वाफ येऊ द्या. साजूक तूपाबरोबर पान खायला द्या.
सुरणाचा कीस
साहित्य- पाव किलो सुरण , चार-पाच हिरव्या मिरच्या , एक टी स्पून जिरं , ओलं खोबरं , पाव वाटी दाण्याचा कूट , तीन चार टी स्पून चिंचेचा कोळ , मीठ , साखर , तूप किंवा तेल.
कृती- सुरण किसून घ्या. पातेल्यात तूपाची फोडणी करुन त्यावर जिरं-मिरच्यांचे तुकडे घाला. सुरणाचा कीस , चिंचेचा कोळ , साखर आणि मीठ चवीप्रमाणे घालून परतून शिजू द्या. किस शिजून मोकळा व्हायला हवा. शेवटी दाण्याचा कूट आणि खोबरं घाला
Sunday, October 14, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment